औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. थेरगाव (ता.पैठण) येथे शनिवारी (दि. 3) सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पूजा राम चोरमारे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती इयत्ता बारावीत शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, राम चोरमारे हे थेरगाव (ता.पैठण) शिवारात आपल्या कुटुंबियांसह शेतात वस्तीवर राहतात. पुजा ही नेहमीप्रमाणे सकाळी उठून आपले घरकाम करून पाणी आणण्यासाठी आपल्या घराजवळील विहीरीवर गेली. पाणी शेंदताना तीचा तोल जाऊन, पाय घसरून ती विहिरीत पडली. पाणी आणण्यासाठी गेलेली मुलगी 1 तास उलटूनही घरी न परतल्याने आई – वडिलांसह घरातील नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीमध्ये पाणी शेंदण्याची बादली व पुजाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला. विहिरीवर ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थानीही घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची ग्रामस्थासह पाचोड पोलिसांना दिली. ग्रामस्थांच्या मदतीने पुजाचा मृतदेह विहीरीबाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकिय तपासणीनंतर मृत घोषित करण्यात आले.