बुलंदशहर : वृत्तसंस्था – वर्गात बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने एका अल्पवयीन मुलाने आपल्या सहकारी विद्यार्थ्यांवर गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली असून परवाना असलेली बंदूक जप्त केली आहे. हे दोन्ही विद्यार्थी दहावीत शिकत असल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दोन मुलांमध्ये वर्गात बसण्याच्या जागेवरून वाद झाला. यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मात्र, आरोपी विद्यार्थी इतका रागात होता की, दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी बंदूक घेऊन शाळेत आला. ही बंदूक आरोपी विद्यार्थ्यांच्या काकांची असून, ते सेनेत कार्यरत आहेत. काका सध्या सुट्टी घेऊन घरी आले आहेत, अशी माहिती पोलिसानी दिली आहे.
ही घटना घडली तेव्हा वर्गात शिक्षक शिकवत होते. आरोपी विद्यार्थ्याने दप्तरातून बंदूक काढली आणि सहकारी विद्यार्थ्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी विद्यार्थ्याच्या डोक्यावर लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अचानक गोळी झाडल्याचा आवाज ऐकून अन्य विद्यार्थ्यांनी गोंधळून गेले. याचा फायदा घेत अल्पवयीन मुलगा निसटण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, अन्य शिक्षकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. शिक्षकांशीही विद्यार्थ्याने झटापट करत गोळी झाडण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती शालेय व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने शाळेत जाऊन आरोपी विद्यार्थ्याला अटक केली, असे पोलिसांनी सांगितले.