याबाबत श्वेता कांबळे हिचे वडील संतोष कांबळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ‘ श्वेताला शाळेतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शनिवारी लस देण्यात आली. ही लस देण्यापूर्वी आम्हाला शाळेत बोलावून सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच जर ही लस दिल्यानंतर ताप आला तरी घाबरण्याचे कारण नाही असे देखेल सांगण्यात आले होते. रविवारी श्वेताला ताप आला होता. तिला ताप आल्यानंतर आम्ही तिला हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात दाखवले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी ससून येथे दाखल करायला सांगितले.
माझी मुलगी मरणाच्या दारात
श्वेताचे वडील हे हडपसर येथिल १५ नंबर , मंजुरी रोड परिसरात राहतात. ते अपंग आहेत श्वेताची आई घरकाम करते. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. आता डॉक्टरांनी श्वेताला उपचाराकरिता काही इंजेक्शन घ्यायला लावली आहेत. ज्यातील प्रत्येक इंजेक्शनची किंमत ७००० रूपये आहे. आता तिच्या उपचाराकरिता पैसे मिळणे कठीण झाले आहे , असे संतोष कांबळे यांनी सांगितले. तसेच श्वेताची तब्येत लस दिल्यानंतरच खराब झाली. आता ती मरणाच्या दारात आहे , असे सांगत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
दरम्यान काल पुण्यातील दत्तवाडी परिसरातील शाळेतील पाच विद्यर्थ्यांना देखील या लसीमुळे त्रास झाला होता. त्यांना या लसीकरणानंतर उलटी आणि चक्कर येऊ लागली होती. त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच जनता वसाहत शाळेतील मुलींना देखील लसीकरणानंतर त्रास झाला होता. पिंकी पवार (वय१०) या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण या विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. यापूर्वी सर्वप्रथम मुंबई येथे या लसीकरणानंतर विद्यार्थ्यंना रिअॅक्शन आल्याची घटना समोर आली होती.
पालकांपुढे प्रश्न
शाळेच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर अनेक पालकांनी या लसीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोगप्रतिकारक शक्तीनुसार मुलांमध्ये आढळतात लक्षणे
मुंबईमध्ये ही लस दिल्यानंतर उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे या कारणांसाठी पाच मुलांना जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील तीन जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. ही मुले गंभीररित्या आजारी नव्हती तर लस दिल्यानंतर रोगप्रतिकारशक्तीनुसार काही मुलांमध्ये अशी लक्षणे आढळतात, तशीच लक्षणे या मुलांमध्ये आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यसंचालक डॉ. संजीवकुमार कांबळे यांनी दिली.