कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – येथील शाहू समाधीस्थळासाठी आवश्यक असलेल्या सहा कोटी रुपयांच्या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट घडवून आणून हा प्रश्न लवकरच सोडवू, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली. महापौर सरिता मोरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी निधीबाबत आपण आगृही राहू, असे स्पष्ट केले.
महापौर मोरे यांनी सांगितले की, महापालिकेच्या वतीने स्वनिधीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळ विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे समाधीस्थळ सध्याच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरणार आहे. यामध्ये समाधीस्थळ विकसित करणे, समाधीस्थळावर मेघडंबरी बसवणे, समाधीस्थळाला संरक्षक भिंत उभी करणे, पादचारी मार्ग करणे, समाधीस्थळाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नूतनीकरण व त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित कलादालनाची निर्मिती करणे, वाहनतळाची सुविधा करणे, परिसरातील ऐतिहासिक समाधी वास्तूंचे संवर्धन, दुरुस्ती व डागडुजी करणे, विद्युतीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या उर्वरित कामासाठी शासनाकडूनच निधी मंजूर होणे आवश्यक आहे.
समाधीस्थळ विकसित करण्याच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, सद्य:स्थितीत या प्रकल्पाची अंदाजित किंमत १० कोटी आहे. महापालिकेने स्वनिधीतून १ कोटी ८ लाख निधी उपलब्ध केला असून, उर्वरित निधी शासनाने द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पवार यांनी याप्रश्नी महापालिकेने पत्र द्यावे, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांची याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. या बैठकीस आपण स्वत: उपस्थित राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेविका हसीना फरास, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक राजेश लाटकर, माजी नगरसेवक आदिल फरास, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, व्ही. बी. पाटील आदी उपस्थित होते.