परभणी : बहुजननामा ऑनलाइन – धनगर समाजास एस.टी. आरक्षणासह विकासापासून वंचित ठेवणाऱ्या प्रस्थापितांविरूध्द धनगर समाजाच्या युवकांनी पेटून उठावे, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले. गंगाखेड येथील रघुवीर जिनिंगच्या मैदानावर आयोजित आरक्षणाच्या एल्गार मेळाव्यात बोलत होते.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी आमदार अनंतकुमार पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव जानकर, प्रा.यशपाल भिंगे, ॲड.हरिभाऊ शेळके, शिवदास बिडगर, भीमराव सातपुते उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य शिवाजी दळणर, उपसभापती माधव शेंडगे, शंकर वाघमारे, करूणा कुंडगीर, अंजना बिडगर, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष सखाराम बोबडे, तुकाराम साठे यांची उपस्थिती होती.
पडळकर म्हणाले की, सत्तर वर्षात काँग्रेसने जे केले तेच काम भाजप सरकार करीत आहे. वेगवेगळे कारण पुढे करून धनगर समाजास आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करणाऱ्या सरकारला खाली खेचण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उत्तमराव जानकर, प्रा. डॉ. यशपाल भिंगे, विठ्ठल रबदडे, करूणा कुंडगीर आदींची समयोचित भाषणे झाली.
मेळाव्यास गंगाखेड विधानसभा मतदारसंघ संघासह परभणी जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोईजड यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय कुडगीर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तमराव जानकर, मंगेश घोरपडे,अशिष बोबडे, महादू काळे, गोवर्धन भंडारे, मुजा शिंदे, नारायण घनवटे, दत्तराव करवर, मुंजा भुमरे, मुक्तीराम आळसे, महादू सुरवसे आदींनी पुढाकार घेतला.