लातूर : बहुजननामा ऑनलाइन – गांधीनगर ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या वरील हॉलला छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असा फलक लावण्यास प्रशासनातर्फे टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने गांधीनगर ग्रामपंचायतीवर २३ जानेवारी रोजी तुतारी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसा इशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला.
या मोर्चास शिवसेनेच्या वाहतूक सेनेनेही पाठिंबा दिला असून वाहतूक सेनेचे कार्यकर्तेही मोर्चात सहभागी होणार आहेत. छ. शिवाजी महाराजांचे नाव ग्रामपंचायतीच्या हॉलला देण्यात यावे, असा ठराव २०१७ मध्ये गावसभेत मंजूर झाला. मासिक सभेतही मंजुरी मिळाली; पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याप्रश्नी दलित महासंघाने वेळोवेळी ग्रा.पं.स निवेदने दिली तरीही या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. फलक लावण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाल्याने दलित महासंघ मोर्चा काढणार आहे. तसे निवेदन ग्रामपंचायतीस देण्यात आले आहे.
मोर्चाचा इशारा दलित महासंघाचे करवीर तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, मोहन बोराडे, नबीसाब नदाफ, राजू कांबळे व वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष वीरेंद्र भोपळे, उपाध्यक्ष रामभाऊ साळुंखे, संदीप पवार यांनी दिला.