सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण महाराष्ट्रापुरतेच आहे. त्यामुळे केंद्रीय स्तरावर आरक्षण मिळण्यासाठी व सकल मराठा समाजाला देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी दि.९ जानेवरी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
त्यासाठी रविवार, दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अवंती नगर येथील मनोहर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक होणार असल्याची माहिती माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला राज्यभरातून २०० हून अधिक समन्वयक येणार असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. मराठा समाजाला दिलेल्या आश्वसनाची पूर्तता अद्यापही होताना दिसून येत नाही. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे जिल्ह्यातील सुमारे ३०० लोकांनी अर्ज केले असून, त्यातील केवळ ६० जणांच कर्ज वाटप झाले आहे. बँकांकडे हेलपाटे मारुन बेरोजगार युवक वैतागले आहत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेचे उद्घाटन होऊ आठ महिने झाले. पण त्याठिकाणी अद्याप नोकर भरती न केल्यामुळे संस्था आजही बंद अवस्थेत आहे. ५० टक्के शैक्षणिक फी माफीबाबत शासनाने जी. आर. काढूनही अनेक शिक्षण संस्था या सवलतीपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवत आहे. डॉ. पंजाबाराव देशमुख विद्यार्थी वसतिगृह योजना सोलापुरात शहरात चालू करण्यात आली. मात्र, गैरसुविधांमुळे त्याठिकाणी विद्यार्थी राहण्यास तयार नाहीत. याबाबतही शासन गंभीर नाही. या सर्व मागण्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष भेट निवेदन देण्यात येणार असल्याचे माऊली पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस गणेश डोंगरे, भाऊसाहेब रोडगे, सुहास कदम उपस्थित होते.