औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – वंदे मातरमचा आवमान करणाऱ्या एमआयएमच्या निलंबित नगरसेवकावर ३० वर्षीय महिलेने नोकरी, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रशीदपुरा परिसरात पतीने सोडून दिल्याने आईसोबत राहत असणाऱ्या ३० वर्षीय महिलेला वर्षभरापूर्वी आधार कार्ड तयार करून घेण्यासाठी गेली असता, एमआयएमचे निलंबित नगरसेवक सय्यद मतीन ( ३५ ) यांनी नोकरी मिळवून देतो, तसेच लग्नही करतो. असे आमिष दाखवून जवळीक निर्माण केली. दरम्यान राशिदपुरा परिसरातील टाऊन हॉल येथे एका घरात त्या महिलेवर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या सर्व प्रकारानंतर त्या महिलेने लग्नासाठी हट्ट धरला मात्र सय्यद मतीनने लग्नास नकार दिला. त्या महिलेला दोन मुले आहेत.
दरम्यान, त्या महिलेने पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतीनविरुद्ध नोकरी, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली. असे सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले आहे. इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानूसार पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.