सातारा : बहुजननामा ऑनलाइन – माण तालुक्यातील म्हसवड येथे दि. १८ ते २0 जानेवारी या कालावधीत तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होणार असून त्याचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे तर ग्रंथदिंडीचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आणि समारोप खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. टकले म्हणाले, ‘म्हसवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात धनगर साहित्य परिषदेच्यावतीने हे संमेलन होणार आहे. शुक्रवार, दि. १८ रोजी सकाळी नऊ वाजता ध्वजपूजन व ग्रंथदिंडीचा शुभारंभ उदयनराजेंच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, एन. शेषगिरीराव, गणेश हाके, डॉ. मुरलीधर केळे, बाळासाहेब कर्णवर, अमरजितराजे बारगळ, डॉ. केशव काळे, रमेश पाटोळे, नितीन राजगे, भगतसिंग वीरकर, स्नेहल सूर्यवंशी यांची उपस्थिती आहे. आहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था, परिसरातील गझी ढोल, लेझीम पथके तसेच विविध प्रसंगावर आधारित चित्ररथ या ग्रंथदिंडी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. शनिवार दि. १९ रोजी यशवंत तांदळे कवीकट्ट्याचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मंत्री राम शिंदे, मंत्री महादेव जानकर, मंत्री राजकुमार बडोले, सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रविवार, दि. २0 रोजी खासदार सुप्रिया सुळे, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार असून यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खा. राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर इतर मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.