नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – हलबा समाजाला संविधानदत्त अधिकारासह वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हलबा क्रांती सेनेने १५ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. आता उपोषणकर्ते भगतकर प्रकृती ढासळत चालल्याने हलबा आंदोलनातील अस्वस्थता वाढत चालली आहे. आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलकांनी रेशीमबाग परिसरात एका बसच्या काचा फोडून रोष व्यक्त केला. समाजाच्या भावना स्फोटक असून प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
गांधीबागेतील रा. बा. कुंभारे पुतळा परिसरातील या आंदोलनाकडे राजकीय तसेच शासकीय दुर्लक्ष होत असल्याने ते हिंसक वळणावर पोहोचले आहे. संतप्त तरुणांनी दोन ठिकाणी बसेसची तोडफोड करीत शासन विरोधातील रोष व्यक्त केला होता. दुसèयादिवशी पुन्हा रेशीमबागेतून श्रीकृष्णनगरकडे जाणाऱ्या आपली बसला आंदोलकांनी लक्ष्य करून काचा फोडल्या. हलबा क्रांती सेनेचे अध्यक्ष पे्रमलाल भांदककर आणि जगदीश खापेकर यांच्या नेतृत्वात कमलेश भगतकर यांनी उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी उपोषणकर्ते भगतकर यांची प्रकृती ढासळून रक्तदाब सामान्यापेक्षा खूपच कमी झाला. शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. मात्र, भगतकर उपोषणावर ठाम असून समाजाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख आणि माजी आमदार वामनराव चटप यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. समाजाचा वाढता रोष लक्षात घेता प्रशासनाने अखेर आंदोलनाची दखल घेत मंगळवारी चर्चेची तयारी दाखविली. चर्चेसाठी उपोषणस्थळी येण्याबाबतची सूचना दिल्याची माहिती आंदोलकांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार ही चर्चा होणार आहे.