औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इ्स्टिटट्यूट ऑफ पाली ॲण्ड बुद्धिझमतर्फे शुक्रवारी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य धम्माचल येथे १३ वी अखिल भारतीय बौद्ध परिषद होणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून ही परिषद होत आहे. सकाळी दहा वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त सदानंद महाथेरो असतील.
यावेळी भदन्त डॉ. एन. आनंद महाथेरो यांच्या हस्ते धम्माचल स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. परिषदेला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिषदेसाठी दक्षिण कोरियातील काही उद्योजक, २५ नागरिक असे ३५ जण येणार आहेत. त्यांनी या परिषदेला वैयक्तिक खर्चातून हजेरी लावली असून संस्थेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानाची आणि खानपानाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी सांगितले.
परिषदेला भदन्त बोधीपालो महाथेरो, भदन्त धम्मसेवक महाथेरो, भदन्त धम्मरतन महाथेरो, भदन्त प्रज्ञादीप महाथेरो, भदन्त महानामा थेरो, श्रीलंकेचे भदन्त डॉ. ज्ञानदीप महाथेरो आदी मान्यवर भिक्खूंची उपस्थिती राहणार आहे. धम्मपरिषदेला उपासक आणि उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, सचिव उपगुप्त महाथेरो, बी. के. आदमाने, सु.ल. जाधव, एम. एन. गायकवाड, डॉ. के. डी. गायकवाड यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इ्स्टिटट्यूट ऑफ पाली ॲण्ड बुद्धिझमचे संशोधन केंद्र येत्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संस्थेने प्रस्ताव दाखल केला आहे. या संस्थेचा पाली विद्यापीठ उभारण्याचा मानस असल्यामुळे त्यादृष्टीनेच १०० एकर जमीन घेऊन पूर्ण आराखडा तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत ७१ एकर जमीन खरेदी केली असल्याचे भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी सांगितले.