बीड : बहुजननामा ऑनलाइन – पाथर्डीच्या प्रा. जनार्धन बोडखे यांना यशवंत रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड आयोजित यशवंतराव चव्हाण सभागृह बीड येथे माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर, माजी आ.बदामराव पंडित, माजी जि.प अध्यक्ष डॉ. शिवाजीराव राऊत, प्रा.सर्जेराव काळे, युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इंजी.विष्णू देवकाते, हनुमंत काळे, संयोजक प्रा,राजेंद्र गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र बहुजन सेनेचे २१ पासून साखळी उपोषण
प्रा. जनार्धन बोडखे हे विविध सामाजिक विषयांवरती भाष्य असलेले श्री संत भगवान बाबा दसरा विशेषांक या पुस्तकाचे प्रकाशन दरवर्षी करतात. अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पथनाट्याद्वारे स्त्री भ्रूणहत्या थांबवा, मुलीच्या जन्माचे स्वागत करा, ग्रामसभा बळकटीकरण, पाणी अडवा पाणी जिरवा, स्वच्छतेचा संदेश, पर्यावरण आरोग्य आदी विषयावर समाजप्रबोधन केले. प्रा.जनार्धन बोडखे हे पाथर्डी शहरात गेल्या १५ वर्षांपासून स्वर साधना संगीत विद्यालय चालवत आहेत. त्यांनी गायन, हार्मोनियम, तबला आदी विषयाचे अनेक विद्यार्थी घडवले आहेत. यासह विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यशवंत रत्न या पुरस्काराने जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना गौरविण्यात आले.
या पुरस्काराबद्दल एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ढाकणे, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, एम.एम.निऱ्हाळी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी प्रा.बोडखे यांचे कौतुक केले आहे.