बहुजननामा ऑनलाइन टीम – फ्रान्समध्ये महिलांनी टॉपलेस होऊन समुद्रकिनार्यावर सनबाथ घ्यावा की नाही या मुद्द्यावरुन चर्चा रंगली आहे. सोशल मिडियापासून ते राजकारण्यांपर्यंत या विषयावर वेगवगेळी मत व्यक्त करण्यात आले. त्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांना यासंदर्भात स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकावा लागला आहे. टॉपलेस होऊन सनबाथ घेणे महिलांचा हक्क असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांना फटकारले आहे.
मागील आठवड्यात समुद्रकिनार्यावर तीन महिला टॉपलेस होऊन सनबाथ घेत होत्या. या महिला धुम्रपानही करत होती. त्यावेळी तेथे आलेल्या पोलिसांनी या महिलांना कपडे घालण्यास सांगितले. समुद्रकिनार्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी महिलांना कपडे घालण्यास सांगितले होते. या कुटुंबाला महिलांना अर्धनग्न अवस्थेत पाहणे योग्य वाटत नसल्याने त्यांनी तक्रार केली होती. मात्र हे प्रकरण नंतर तापले आणि थेट व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचे आरोप करण्यात आले. अखेर आता फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी महिलांच्या बाजूने आपले मत मांडले असून महिलांना अशाप्रकारे कपडे घालायला सांगणे व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे म्हटले आहे.