पीलीभीत : वृत्तसंस्था – देशभरातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथे उघडकीस आली आहे. एका महिलेला (Woman) ब्लॅकमेल (blackmail) करत तब्बल 21 वर्षे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मालमत्तेच्या हव्यासापोटी महिलेचा खून करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, एका 42 वर्षीय महिलेचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कॉलेजमधील एक क्लार्क आणि त्याच्या दोन साथीदारांवर खूनाचा आरोप आहे. आरोपींनी 21 वर्षे या महिलेचे लैंगिक शोषण करुन तिचा खून केला.
पीलीभीत पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात पोलिसांकडे अनेकवेळा तक्रार केली. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर न्यायालयालयाचा दरवाजा ठोठावला, असे मयत महिलेच्या वृद्ध आईने सांगितले. सुनगडी पोलीस ठाण्याचे एसएचओ अतर सिंह यांनी सांगितले की, तिन्ही आरोपीच्या विरोधात 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
वृद्ध आईने मयत मुलीच्या बाबतीत घडलेल्या प्रकारची माहिती देताना सांगितले, माझी मुलगी 21 वर्षाची होती. त्यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आरोपी रमेश सिंह हा महाविद्यालयात क्लार्क होता. त्याचे आणि माझ्या मुलीचे प्रेमसंबंध जुळले. त्यावेळी त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करु लागला. माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तिचे लग्न झाल्यानंतर आरोपींनी तिच्या पतीला सर्व सांगितले. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला.
मुलीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आरोपींचे घरी येणे-जाणे वाढले. मी हतबल होती. रमेश हा नेहमी येताना सोबत त्याचा साथीदार चंद्रशेखर आणि दिलीप सिंह यांना घेऊन येत होता. 12 मार्च रोजी काही कामानिमित्त मी घराबाहेर होते. त्या तिघांनी मिळून मुलीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जाळला, अशी माहिती मयत महिलेच्या वृद्ध आईने दिली. यासंबंधीचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.