चंदीगड : वृत्त संस्था – दिल्ली हरियाणा टिकरी सीमेवरील शेतकर्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगालमधील एका सामाजिक कार्यकर्तीवर सामुहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हरियाणा पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह ६ जणांवर सामुहिक बलात्कार, विनयभंग यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी रविवारी विशेष तपास पथक तयार करण्यात आले असल्याचे बहादूरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले.
याबाबत या तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, ती १० एप्रिल रोजी बंगालहून टिकरीला जाण्यासाठी रेल्वेने निघाली होती. रेल्वे प्रवासात सहा आरोपींपैकी एकाने तिचा विनयभंग केला होता. तेव्हा तिने असे वर्तन पुन्हा न करण्याचा इशारा दिला होता.
२५ एप्रिल दरम्यान तिला कोविडची लक्षणे दिसू लागल्याने या २५ वर्षाच्या तरुणीला झाज्जार जिल्ह्यातील बहादुरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा ३० एप्रिल रोजी मृत्यु झाला. या तरुणीने आपल्यावरील आपबिती आपल्या वडिलांना फोनवरुन कळविली होती. ही तरुणी १० एप्रिलला टिकरी येथे आंदोलनस्थळी पोहचल्यावर तिच्याबरोबर आलेल्या या ६ जणांपैकी दोघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या घटनेनंतर तिला कोरोनाचा संसर्ग झाला. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.
या प्रकरणी पोलीस उपायुक्ताच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.