नदिया/पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – जय श्री रामची घोषणा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन भाजप कार्यकर्त्याने एका दहा वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये समोर आली आहे. ही घटना नदिया जिल्ह्यातील फूलिया येथे सोमवारी (दि.19) दुपारी घडली. सोमवारी दुपारी मुलगा चहाच्या दुकानासमोरुन जात असताना भाजप कार्यकर्त्याने त्याला आडवले. मुलाला जय श्री रामची घोषणा देण्यास सांगितले. मात्र, मुलाने घोषणा देण्यास नकार दिल्याने त्याला बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रोहन शर्मा (बदलले नाव) असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. रोहन हा चौथ्या इयत्तेत शिकत असून या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रानाघाट येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त नागरिकांनी मुलाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या चहाच्या टपरीची तोडफोड करुन त्याला मारहाण केली. महादेव प्रामाणिक असे या चहाच्या टपरी मालकाचे नाव असून त्याला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग 12 वरील वाहतूक अडवून आरोपीला अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली.
मुलाला मारहाण केल्यानंतर नागरिक संतप्त झाले असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांची समजूत घालून एक तास अडवलेली वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी प्रामाणिकला अटक करण्याचे आश्वासन यावेळी दिले. त्यानंतर स्थानिकांनी महामार्गावरुन बाजूला होऊन महामार्ग मोकळा केला. ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आरोपी प्रामाणिक हा घटनेनंतर फरार झाला आहे. तो भाजप महिला नेत्या असणाऱ्या मिठू प्रामाणिकचा पती आहे.
मुलाचे वडील तृणमूल काँग्रेसचे समर्थक – पोलीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला मुलगा हा नाटकामध्ये स्त्री पात्र साकारणाऱ्या कलाकाराचा मुलगा आहे. हा कलाकार तृणमूल काँग्रेसचा समर्थक आहे. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, हा मुलगा प्रामाणिकच्या चहाच्या दुकानाजवळून जात होता. त्यावेळी प्रामाणिक याने मुलाला हाक मारुन बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मुलाला त्याच्या वडिलांचा तृणमूलकडे ओढ असल्यावरुन डिवचले. 17 एप्रिल रोजी निवडणुक प्रचारात मुलाच्या वडिलांनी सहभाग घेतला होता. हे प्रामाणिकला खटकले असावे असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. प्रामाणिक याने मुलाला धमकावत जय श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितले. मात्र, मुलाने घोषणा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या प्रामाणिकने मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करुन मुलाची प्रामाणिकच्या तावडीतून सुटका केली.
पोलिसांनी मुलाचा जबाब नोंदवला
घडलेल्या घटनेमुळे मुलाला मानसिक धक्का बसला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, प्रामाणिकने जय श्री रामची घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच वडिलांना शिवीगाळ केली. मी या सर्व गोष्टींना विरोध केला असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने मला कानाखाली लगावली. त्यानंतर तो मला लाथा मारु लागला, अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली.
भाजपचे क्रूर राजकारण
रुग्णालयातील सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, या मुलाच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या यूथ विंगचे नेते पीटर मुखर्जी यांनी, या घटनेमुळे भाजपचे राजकारण किती क्रूर आहे हे दिसून येत आहे. आई नसणाऱ्या या मुलालाही भाजपने सोडले नाही, अशी टीका केली आहे.
मुलानेच आपल्या पडलीला डिवचले
या प्रकरणावर भाजपच्या महिला नेत्या आणि आरोपीची पत्नी मिठू यांनी सांगितले की, हल्ला झाल्याचं मान्य आहे मात्र या मुलानेच पतीला डिवचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मुलाने दुकानावर दगडफेक करत दुकानातील काचेची भांडी फोडल्याचा दावा मिठू यांनी केला आहे. त्यानंतरच माझ्या पतीने या मुलाला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. टीएमसी या प्रकरणावरुन सर्वसामान्यांमध्ये असणारी आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मिठू प्रामाणिक यांनी केला आहे.