विजयवाडा : वृत्तसंस्था – एका मंदिरात भीक मागणाऱ्याने मागील ७ वर्षांमध्ये एका मंदिराला ८ लाख रु. दान केले असून ही घटना आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील आहे. एका ७३ वर्षाच्या भिकाऱ्याने हे पैसे दान केले आहेत. त्या भिकाऱ्याने मंदिराला दान केल्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगितले आहे. मंदिर प्रशासनाने भिकाऱ्याच्या या दानाचे कौतुक करत त्याने दिलेल्या दानातून गोशालेची बांधणार असल्याचे सांगितले आहे.
या भिकाऱ्याचे वय ७३ असून त्याचे नाव यादी रेड्डी असे आहे. त्याने भिकारी होण्याअगोदर ४० वर्षं रिक्षा ओढण्याचे काम केले. पण गुडघ्याचा त्रास झाल्याने पर्यायाअभावी मंदिराबाहेर बसून भीक मागण्याचे ठरवले, अशी माहिती मिळत आहे.
यावर रेड्डी हे बोलत असताना त्यांनी सुमारे ४० वर्षं रिक्षा चालवली असल्याचे सांगितले. सर्वात पहिले मी एक लाख रु. साईबाबा मंदिराच्या अधिकाऱ्यांना दान स्वरुपात दिले, असे त्यांनी सांगितले. तसेच माझी तब्येत बिघडू लागल्यानंतर मला अधिक पैशांची गरज भासू लागली. म्हणून मी मंदिरालाच अधिक पैसे दान करण्याचा निर्णय घेतला. आणि याच पुण्याईने माझी मिळकत वाढेल असे मला वाटले होते, असेही रेड्डी म्हणाले.
त्यांनी मंदिराला दान करू लागल्यावर आपले उत्पन्न वाढू लागल्याचे सांगितले. ‘मंदिराला दान देत गेल्यामुळे लोक मला ओळखू लागले. मी आतापर्यंत मंदिराला ८ लाख रुपयांचे दान दिले असून मी माझी सर्वच कमाई मंदिराला दान देणार आहे,’ असे त्यांनी आपल्या दानशूरतेबाबत बोलताना सांगितले. तर रेड्डी यांच्या दानामुळे मंदिराचा चांगला विकास होऊ लागला, असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.