बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सिरम इंस्टिट्युटचे प्रमुख हे वर्गमित्र आहेत आणि यामुळंच पवारांनी कोरोनावरील लस घेतली आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये सुरू आहे. यासंदर्भात शरद पवारांनी खुलासा केला आहे. हो, सिरम इंस्टिट्युटकडून मी लस घेतली आहे. परंतु ती कोरोनावरील नसून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवारांनी शुक्रवारी पुण्यात सिरम इंस्टिट्युटला भेट दिली. त्यावेळीत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, “मी व माझ्या सहकाऱ्यांनी लस घेतली आहे. मात्र ती कोरोनावरील नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे. कोरोनावरील लस उपलब्ध होण्यासाठी आणखी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कदाचित जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात ही लस मिळेल अशी माहिती सिरमकडून देण्यात आली आहे” असा उल्लेखही पवारांनी केला.
हाथरस रेप केसवरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे त्या तरुणीसोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असा आहे. पोलिसांनीही परस्पर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना देशातील जनतेनं प्रथमच पाहिली आहे. युपी सरकारनं कायद्याला कवडीची किंमत दिली नाही हे यावरून अधोरेखित होतं. याशिवाय शांततेच्या मार्गानं पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या राहुल गांधी यांना जी काही वागणूक देण्यात आली ती अत्यंत चुकीची आणि अशोभनीय आहे.” असंही ते म्हणाले.