बहुजननामा ऑनलाईन- अमेरिकेने बुधवारी 100 व्हेंटीलेटर्सची शेवटची बॅच भारताकडे सोपवली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना महामारीसोबतच्या लढाईत भारताला मदत करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत अमेरिकेने भारताला 200 व्हेंटीलेटर देण्याची घोषणा केली होती. अमेरिकेने 100 व्हेंटीलेटर्सची पहिली बॅच 14 जून रोजी भारताला दिली होती.
अमेरिकन राजदूतांनी दिली प्रतिक्रिया
भारतातील अमेरिकन दूतावासाने सांगितले की, या व्हेंटीलेटर्सचा वापर सोपा आहे. अमेरिकन राजदूत केनेथ जस्टर यांनी म्हटले की, आम्हाला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनुसार भारताला कोरोनाशी लढण्यासाठी 100 व्हेंटीलेटर्सची शेवटची बॅच सोपवताना आनंद होत आहे. या मशीनच्या वारंटीसह याच्यासाठी आवश्यक ट्यूब आणि फिल्टर इत्यादी उपकरणे सुद्धा अमेरिका देईल. अमेरिका भारत सरकारसोबत एकत्रितपणे आरोग्य कर्मचार्यांच्या क्षमतावाढीसाठी सुद्धा काम करत आहे.
फ्रान्सने सुद्धा भारताला मदत म्हणून मागील काही दिवसात व्हेंटीलेटर, तपासणी किट व अन्य वैद्यकीय उपकरणे दिली होती. फ्रान्स हवाई दलाच्या विमानाने भारतात आणलेली ही उपकरणे भारतातील फ्रान्सचे राजदूत एमॅनुएल लेनिन यांनी पालम एयर फोर्स स्टेशनवर भारतीय रेडक्रॉस सोसायटीकडे सोपवली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, फ्रान्सकडून ही उपकरणे भारताला सोपवल्याने आनंद होत आहे. फ्रान्सने भारताला 200 मिलियन यूरो (सुमारे 1,756 कोटी रुपये) ची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारने मागील पाच महिन्यात राज्य, केंद्र शासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना 3.04 कोटीपेक्षा जास्त एन 95 मास्क आणि 1.28 कोटीपेक्षा जास्त पीपीई किट वितरित केले होते. याशिवाय 22 हजारपेक्षा जास्त मेक इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवले आहेत.