लखनौ : वृत्तसंस्था – भाजपाने फतेहपूर चौरासी तृतीय मतदारसंघामधून संगीत सेंगर हिला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगीत सेंगर ही उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगर याची पत्नी आहे. संगीत सेंगर सध्या जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे. २०१६ मध्ये ती जिल्हा परिषदेची अपक्ष अध्यक्ष बनली होती. दरम्यान,माजी जिल्हाध्यक्ष आनंद अवस्थी यांना सरोसी प्रथम आणि नवाबगंजचे ब्लॉक प्रमुख अरुण यांना औरास द्वितीय येथून उमेदवारी दिली आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगर याला गतवर्षी न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने सेंगरसह सर्व दोषींना १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. विशेष म्हणजे, बलात्कार प्रकरणात कुदीप सिंह सेंगर दोषी आढळल्याने भाजपची मोठी कोंडी झाली होती. सेंगर हा भाजपचा आमदार होता. तो दोषी आढळल्याने पक्षातून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून सेंगर हा चार वेळा आमदार राहिला आहे. भाजपाच्या तिकिटावर २०१७ मध्ये तो निवडून आला होता. मात्र उन्नाव बलात्कार प्रकरणात त्याला अटक झाली होती. २०१९ मध्ये भाजपने पक्षातून त्याची हकालपट्टी करण्याबरोबरच त्याचे विधानसभा सदस्यत्वही रद्द केले होते.