बेळगाव : बहुजननामा ऑनलाईन – ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. तर एकजण जखमी झाला आहे. नागराळ-नेज रस्त्यावर नेज गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 5) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्यावरच सोडून तेथून पलायन केले.
सुनील कलगौडा पाटील (वय 18, रा. नेज) आणि मल्लिकार्जुन शिवनायक पुजारी (वय 18 रा. नेज) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सूरज शिंदे (वय 18, रा. नेज) असे जखमीचे नाव आहे. सुनील पाटील याच्या मागे आई, वडील व मोठी बहीण तर मल्लिकार्जुन पुजारी याच्या मागे आई-वडील असा परिवार आहे. दोघेही घरात एकुलते मुलगे होते. त्यांच्या अपघाती जाण्याने नेज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागराळ-नेज रस्त्यावर शुक्रवारी (दि. 5) रात्री 8 वाजता नागराळहून नेजकडे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुनील पाटील याचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागे बसलेले त्याचे मित्र मल्लिकार्जुन पुजारी व सूरज शिंदे जखमी झाले. उपचारासाठी त्यांना चिक्कोडी येथील रूग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच मल्लिकार्जुनचा मृत्यू झाला. सूरज शिंदे याला गंभीर जखमी झाल्याने बेळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. उपनिरीक्षक आर. वाय. बिळगी व सहाय्यक उपनिरीक्षक व्ही. एस. हज्जे, एस. एन. कडबी, एस. ए. हुगार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे.