नवी दिल्लीः वृत्तसंस्था- युएईस्थित भारतीय वंशाच्या बीआर शेट्टी यांची कंपनी फिनाब्लर पीएलसीला आपला व्यवसाय अवघ्या एका डॉलरमध्ये (73.52 रुपये) इस्त्राईल-युएई कन्सोर्टियमला विकावा लागत आहे. शेट्टी यांच्या कंपन्यांकडे कोट्यवधी डॉलरचे कर्ज आहे. त्याचबरोबर त्याच्या कंपनीविरूद्ध फसवणूकीचा तपास सुरू आहे. यामुळेच फिनेबलरचा व्यवसाय अवघ्या 73 रुपयांना विकला जात आहे.
वर्ष 2019 मध्ये ही शेट्टी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सवर स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापार करण्यास बंदी घातली होती. त्यांची पत संपली म्हणून कोणीही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये तयार झालेल्या कन्सोर्टियमने ही कंपनी घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, फिनाब्लरच्या व्यवसायाचे बाजार मूल्य एक अब्ज डॉलरच्या कर्जाच्या तुलनेत 1.5 अब्ज पाऊंड (2 अब्ज डॉलर) पर्यंत घसरले होते.
फिनब्लरने ग्लोबल फिन्टेक इन्व्हेस्टमेंट होल्डिंग (जीएफआयएच) बरोबर करार जाहीर केला आहे. फिनाब्लर पीएलसी लिमिटेड आपली सर्व मालमत्ता जीएफआयएचला विकत आहे. जीएफआयएच ही इस्राईलच्या प्रिझम ग्रुपची सहाय्यक कंपनी आहे. व्यवहारासंदर्भात प्रिझम ग्रुपने अबू धाबीच्या रॉयल स्ट्रॅटेजिक पार्टनर्सचे एक कन्सोर्टियम तयार केले आहे.
काही अहवालांनुसार, बीआर शेट्टी 70 च्या दशकात फक्त आठ डॉलर्ससह युएईमध्ये गेले होते आणि तेथील वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. शेट्टी यांनी 1970 मध्ये एनएमसी हेल्थ सुरू केले. हेल्थकेअर इंडस्ट्रीत त्यांनी खूप पैसे कमावले. त्यानंतर त्यांनी 1980 साली युएई एक्सचेंजची सुरूवात केली. युएई एक्सचेंज 2018 मध्ये फिन्बलर, यूके-आधारित एक्सचेंज कंपनी ट्रॅव्हलेक्स आणि इतर पेमेंट सोल्यूशन्स प्रदात्यांसह सार्वजनिक झाला होता.