नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) चा नवीन नियम लागू करण्यासाठी अंतिम मुदत वाढविली आहे. यामुळे दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमएनपी चा नवीन नियम आता ११ नोव्हेंबरपासून लागू होईल, जो यापूर्वी ३० सप्टेंबरपासून लागू केला जाणार होता. ट्रायच्या या हालचालीमुळे नव्या ग्राहकांना नंबर पोर्टेबिलिटी लागू होण्यासाठी नवीन नियमांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन नियमांतर्गत मोबाइल नंबर पोर्टिंगसाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. पोर्ट सिस्टम अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या अर्जाच्या २ दिवसांच्या आत अनिवार्यपणे क्रमांक पोर्ट करण्याचे निर्देश दिले.
आत्ता या प्रक्रियेस ७ दिवस लागतात. ट्रायने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुधारित एमएनपी नियम जारी केले आणि ३० सप्टेंबरपासून अनिवार्यपणे लागू केले जाणार होते, परंतु, आता ते ११ नोव्हेंबरपासून लागू होतील. यापूर्वी अंतिम मुदत वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी १७ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर रोजी ट्राईची भेट घेतली होती. ते म्हणाले की नवीन सुविधेच्या चाचणीसाठी अधिक वेळ आवश्यक आहे जेणेकरून नंतर ग्राहकांची गैरसोय होऊ नये.
ट्रायने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची नवीन किंमत ५.७४ रुपये ठेवले आहे. नवीन एमएनपी दर ३० सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. एमएनपीच्या किंमती बदलल्यामुळे दूरसंचार कंपन्यांना मोठा फायदा होईल. कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या संख्येच्या पोर्टसाठी १९ रुपये भरतात. याशिवाय जिओ, एअरटेल, व्होडाफोन आणि बीएसएनएल या कंपन्या एका वर्षात ७५ कोटी रुपयांची बचत करु शकतात.
Visit : bahujannama.com