बहुजननामा ऑनलाईन – एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी TikTok स्टार फन बकेट उर्फ चिप्पाडा भार्गव याला आंध्रप्रदेश पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीकडून कार आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.
पिडीत तरुणी विशाखापट्टणमध्ये राहते. या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी पेंढुर्ती पोलीस ठाण्यात आरोपी भार्गव विरोधात तक्रार दाखल केली होती. पीडित तरुणी 4 महिन्यांची गरोदर असल्याचे समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपीने पीडित तरुणीचे टिकटॉक व्हिडीओ पाहून तिला अनेक ऑफर दिल्या होत्या. नंतर त्याने तिला प्रपोज केले होते.
मात्र तिने त्याचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र तुझे आक्षेपार्ह व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असे सांगून भार्गवने तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेम काजल यांनी दिली. आरोपीला पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली आहे. आरोपी भार्गव हा ओ माय गॉड, ओ माय गॉड! सारख्या टिकटॉक व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याला न्यायालयाने 4 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.