पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राडा घालणा-यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्यावर दोघांनी कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघाना अटक केली आहे. मंगळवारी (दि. 9) रात्री अकराच्या सुमारास अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत एरंडवणे येथे ही घटना घडली.
मंदार मनोहर गरूड (वय 31 रा. अप्पर-इंदीरानगर) आणि शिवम प्रसाद मारणे (वय 22, रा. एरंडवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अनंत त्रिंबक ढवळे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 9) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका स्थानिकाने एरंडवणे येथील गणेशनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक टोळके राडा घालत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती.
त्यानुसार फिर्यादी ढवळे आणि त्यांचे सहकारी संबंधित ठिकाणी पाहणीसाठी गेले. तेथे मंदार गरूड आणि शिवम मारणे हे दोघे आढळून आले. ढवळे यांनी दोघांना याबाबत जाब विचारला असता, त्या दोघांनी त्यांना मारहाण केली, तसेच त्यांच्याकडील कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रय़त्न केला. तसेच त्यांच्या सहका-याला देखील मारहाण केली. यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती अलंकार पोलीसांनी दिली.