बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पाश्वभूमीवर संपूर्ण देशातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली याला जवळपास पाच महिने कालावधी लोटत आला आहे यामुळे यावर आधारित असलेल्या अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर अशा तिर्थक्षेत्राची अर्थव्यवस्था कोलमडली असून सर्वत्र शुकशुकाट पसरलेला आहे. त्यामुळे ही धार्मिक स्थळे त्वरित उघडण्याची मागणी होत आहे. अष्टविनायका पैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे श्री चिंतामणी गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे येथे महाराष्ट्रासह अन्य राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.
थेऊर हे धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने येथे अनेक व्यवसाय चालतात.यात हारफुले विक्रेते धार्मिक पुस्तके विक्रेते तसेच लहान मुलांसाठी खेळणी विक्रीची दुकाने सजलेली असतात.परंतु गेल्या पाच महिन्यात एकवेळ सुध्दा दुकान उघडता आले नाही. तसेच भाविकांना सेवा देणारे आठ ते दहा भक्तनिवास सध्या धुळखात पडून आहेत त्यामुळे यावर उदरनिर्वाह असलेले अनेकजण उपासमारीत जीवन जगत आहेत. तर हाॅटेल व्यवसायावर तर दुहेरी संकट कोसळले आहे कारण एकतर व्यवसाय बंद आणि हाॅटेलचे भाडे अंगावर भरण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे शासनाने इतर व्यवसायाचा विचार केला त्याप्रमाणे सर्व निकष घालून देवालये लवकर उघडावीत अशी येथील व्यावसायिकांनी मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर बाहेर गावाहून भाविक येथे येऊन दरवाजावर दर्शन घेऊन परतत आहेत यावरून सर्वच स्तरातून याचे स्वागत होणार आहे काही भाविकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की हाॅटेल माॅल्स यांना उघडण्याची परवानगी मिळते तर देवळाची दारे का उघडत नाहीत.