बहुजननामा ऑनलाइन टीम – देशभरात नीट आणि जेईई परीक्षांच्या वादात आता कर्नाटक सरकारने महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण सीएन यांनी घोषणा केली की, येत्या १ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालये पुन्हा सुरू होतील.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश म्हणाले की, ‘यावेळेस शैक्षणिक सत्र १ सप्टेंबरपासून ऑनलाईन वर्गाद्वारे सुरू होईल, पण ऑक्टोबरमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू केले जातील.’ ते म्हणाले, ‘राज्य सरकारचा शिक्षण विभाग केंद्र सरकारकडून ऑफलाईन वर्गांच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा करत आहे.’ माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये कर्नाटक सरकारकडून ऑफलाइन वर्ग कसे आयोजित केले जातील, यासाठी तयारी सुरू आहे. याव्यतिरिक्त कोरोना कालावधीत मुले आणि शिक्षकांचे संरक्षण कसे करावे यासाठी देखील नियोजन केले जात आहे.
कोरोना चाचण्यांना चालना
एकीकडे राज्य सरकार महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारने आपली चाचणी क्षमता सातत्याने वाढवली आहे, प्रयोगशाळा आज २ वरुन १०८ पर्यंत झाल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत ३,२३,७५३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. दररोज ५०,००० हून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. काल २५ लाख नमुन्यांच्या चाचणीचा आकडा पार केला. आतापर्यंत एकूण २५,१३,५५५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. मंत्री अलीकडेच म्हणाले होते की, दररोज ७५,००० नमुन्यांची चाचणी घेण्याची सरकारची योजना आहे.
कर्नाटकमध्ये कोरोनाची २ लाखापेक्षा अधिक प्रकरणे
कर्नाटकमध्ये २५ ऑगस्ट संध्याकाळपर्यंत कोविड-१९ ची २.९१ लाख प्रकरणे आढळली. यापैकी २,०४,४३९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत आणि ४,९५८ लोकांचा मृत्यू झाला आहे.