बहुजननामा ऑनलाइन टीम – मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एनएबीएल ॲक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला त्यांनी धन्यवाद दिले आहे.
स्पाईस हेल्थच्या या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासांत मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल अशी माहिती आयुक्त चहल यांनी यावेळी दिली आहे. तसेच गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे. तर आज ही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे प्राधान्य आहे. अशा गरजेच्यावेळी स्पाईस हेल्थ ने पुढे येऊन माफक दरात कोराना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, कमी वेळेत त्या चाचणीचा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होणार आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांचा शोध घेणे त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणी करून घेणे याला आजही खूप महत्व आहे. त्यानंतच उपचार, कॉरंन्टाईन करणे शक्य आहे अशा महत्त्वाच्यावेळी सामाजिक दायित्वातून स्पाईस हेल्थने ही सुविधा उपलब्ध केल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यानी केला आहे. तर कार्यक्रमात स्पाईस हेल्थचे अजय सिंह यांनी ही सुविधा सुरू करण्यामागची भूमिका सांगताना व्हॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे भविष्यात एचआयव्ही सह इतर आजारांच्या चाचण्या ही करता येतील अशी माहिती त्यावेळी त्यांनी दिली आहे. या कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, स्पाईस जेटचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संजय जयस्वाल, स्पाईस हेल्थचे जुबेर खान आदी उपस्थित होते.