बहुजननामा ऑनलाईन टीम – भारताचे महिला आणि पुरुष असे दोन्ही क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळणार आहे. 6-7 वर्षांनंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. पण, यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहवी लागणार आहे. भारतीय महिला संघ दुस-या कसोटी सामन्यासाठी सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून त्याठिकाणी ऐतिहासिक डे-नाईट सामने होणार आहेत.
भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यात 2006 नंतर कसोटी सामना होणार आहे. महिला क्रिकेटमधील हा दुसराच डे नाईट कसोटी सामना असेल. यापूर्वी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात 2017 मध्ये नाईट कसोटी सामना झाला होता. मात्र तो अनिर्णीत राहिला होता. 15 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा हा कसोटी सामना वाका ग्राऊंडवर 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियन महिला संघ वाका ग्राऊंडवर यापूर्वी 3 कसोटी सामने खेळले आहेत आणि तेही प्रथमच येथे डे नाईट कसोटी खेळणार आहेत. या दौऱ्यावर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वन डे व तीन ट्वेंटी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. हे सामने नॉर्थ सिडनी ओव्हल व मेलबर्न येथे होणार आहे. 2020 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलनंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
सामन्याचे वेळापत्रक
19 सप्टेंबर – पहिला वन डे – नॉर्थ सिडनी ( दिवस-रात्र)
22 सप्टेंबर – दुसरा वन डे – जंक्शन ओव्हल
24 सप्टेंबर – तिसरा वन डे – जंक्शन ओव्हल ( दिवस-रात्र)
30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर – कसोटी सामना ( दिवस-रात्र)
7 ऑक्टोबर – पहिली ट्वेंटी-20, नॉर्थ सिडनी ओव्हल
9 ऑक्टोबर – दुसरी ट्वेंटी-20 नॉर्थ सिडनी ओव्हल
11 ऑक्टोबर – तिसरी ट्वेंटी-20 नॉर्थ सिडनी ओव्हल