बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत माझा अभ्यास नाही असा दावा करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज याविषषयी बोलणं टाळणं. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदार संघातील प्रश्नांबाबत चर्चा केली. सुप्रिया यांच्या मतदारसंघातील मोठा भाग हा पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. याच अनुशंगानं ही भेट झाली होती. या बैठकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधताना सुळे यांनी सुशांत सिंह प्रकरणावर बोलणं टाळलं.
सुप्रिया सुळे यांचे भाचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या भूमिकेचे पवार कुटुंबात जोरदार पडसाद उमटले होते. याच पार्श्वभूमीवर सुळे यांनी सुशांत सिंह प्रकरणावर आपला अभ्यास नसल्याचं सांगितलं आणि यावर काहीही बोलणं टाळलं.
पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी उघड भूमिका घेतली होती. अनिल देशमुख यांना तसं पत्र देखील पार्थ पवार यांनी दिलं होतं. देशमुख यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावली होती. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि पार्थचे आजोबा शरद पवार यांनी मात्र यावरून पार्थ यांना फटकारलं होतं. पार्थचा अनुभव तोकडा असून आपण त्याच्या म्हणण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही असं ते म्हणाले होते. यानंतर बरीच खळबळ माजल्याचं दिसून आलं होतं.
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी निर्णय दिला आणि सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. या निर्णयानंतरही पार्थ यांनी सत्यमेव जयते असं म्हणत खोचक ट्विट केलं होतं. यावरूनही चर्चेला तोंड फुटलं होतं. या सगळ्यावर सुप्रिया काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं फारच महत्त्वाचं होतं. पंरतु त्यांनी यावर बोलणंच टाळलं.