बहुजननामा ऑनलाईन टीम – जगभरात ‘झेनुआ डाटा’ चीनमधील कंपनीने अनेकांवर पाळत ठेवल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये विविध देशांच्या राजकीय नेत्यांपासून ते अल्पवयीन चोरट्यांपर्यंत नजर ठेवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. आर्थिक गुन्हे, भ्रष्टाचार, दहशतवाद, संघटित गुन्हे, अंमली पदार्थाची तस्करी करणार्या जवळपास 6 हजार भारतीयांवर कंपनीकडून पाळत ठेवली जात असल्याचे तपासातून उघड झाले आहे.
झेनुआज ओव्हरसीज की इंडिव्हिज्युअल डाटाबेसमध्ये करचुकवेगिरीची प्रकरणे लॉगिन करण्यात आले आहे. त्यामध्ये सत्यम समूहाचे अध्यक्ष रामलिंग राजू यांचे नातेवाईक आणि मित्रांनी स्थापन केलेल्या 19 कंपन्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे चारा घोटाळा करून झारखंडची तिजोरी रिक्त करणारे अधिकारी आणि पुरवठादार आणि मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाचा सहभाग असलेला व्यापम घोटाळा या मोठया प्रकरणांचा डेटाबेसमध्ये समावेश आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ची सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेली चौकशी, नातेवाईकांच्या लाभासाठी मोक्याचा भूखंड देणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या मनीलॉण्डरिंगप्रकरणाचाही डाटाबेसमध्ये समावेश करण्यात आला आहे. आर्थिक गुन्ह्यांबाबतच्या पाहणीचा विस्तार भ्रष्टाचार, लाच आणि फसवणुकीपर्यंत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विविध कारणास्तव ‘सेबी’ने निर्बंध घातलेल्या 500 हून अधिक व्यक्तींची नावेही यादीत आहेत. त्याचप्रमाणे बंदी घालण्यात आलेल्या नोटा बदलणार्यांचाही डाटाबेसमध्ये समावेश आहे.