बहुजननामा ऑनलाईन – अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याप्रकरणी NIA ने अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझेंना विशेष NIA कोर्टात हजर केले असता त्यांच्या कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. यावेळी कोर्टाने CBI ला वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली आहे. चौकशी करण्यासाठी वेळेच नियोजन करा, असे कोर्टाने CBI ला सांगितले आहे.
अंबानीच्या घराजवळ स्फोटक आढळल्यानंतर सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सचिन वाझेकडे देण्यात आला होता. मात्र नंतर हे प्रकरण NIA कडे सोपवण्यात आले. स्फोटक प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटक प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता. दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. 13 तास चाललेल्या चौकशीनंतर NIA च्या पथकाने सचिन वाझे यांना अटक केली. अटक केल्यानंतर वाझेंना NIA न्यायालयसमोर हजर केले होते. न्यायालयाने वाझे यांची 25 मार्च त्यानंतर 7 एप्रिलपर्यंत NIA कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आता 9 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.