नवी मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विजयाशांती (Actress Vijayshanthi) यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दक्षिणेत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर विजयाशांती यांनी भाजपमध्ये प्रवेश करून घरवापसी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्या खुशबू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच सुपरस्टार रजनीकांतही राजकारणात सक्रीय होण्याच्या विचारात आहेत. विजयाशांती यांनी राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकल ते भाजपच्या साथीने. त्यानंतर त्या टीआरएस (TRS) मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर 2014 साली विजयाशांती यांनी काँग्रेसचा हात धरला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्या काँग्रेसमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्या नाराज होत्या.
दाक्षिणात्य चित्रपटातील लेडी अमिताभ
विजयाशांती यांचा जन्म 24 जून 1966 मध्ये तामिळनाडूतील चेन्नई येथे झाला होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फिल्मी लाइनमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. कल्लुकुल एरम हा त्यांचा पहिला सिनेमा. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये विजयाशांती यांनी चांगले नाव कमावल होते. लेडी अमिताभ अशी त्यांची ओळख बनली. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेतील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केले आहे.