सोनिपत : वृत्तसंस्था – कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांना आंदोलन (Farmer Protest) सुरु असताना एका शेतकऱ्याने गोळी झाडून (Shoot) आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोनिपतच्या (Sonipat) कुंडली सीमेवर (Kundali Border) घडली असून या घटनेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सोनिपत कुंडली सीमेवर गेल्या तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे.
बाबा राम सिंग असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते कर्नालच्या सिंगरा गावचे रहिवासी आहेत. ते सोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. बाबा राम सिंग हे त्यांच्या गावातील गुरुद्वारेतील ग्रंथी होते. ते गेले 20 दिवस रोज शेतकरी आंदोलनासाठी कर्नाल ते कुंडली सीमा असा प्रवास करत होते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा राम सिंग आजही आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. आंदोलन सुरु असताना त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या मागे जाऊन त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यांच्याकडे असलेल्या खासगी बंदुकीतुन गोळी झाडल्याचे समजतय. घटनास्थळी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने पानीपत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा मृत्यू
कुंडली सीमेवर मागील तीन दिवसात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आजची ही तिसरी घटना आहे. आजपर्यंत या सीमेवर चार जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी सोमवार आणि मंगळवारी सकाळी आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. वाढत्या थंडीमुळे वयस्कर शेतकऱ्यांची प्रकृती बिघडत आहे. यातच ब्लडप्रेशर आणि तणावामुळे हृदयविकाराच्या झटका येऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.