नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – विवाहबाह्य संबधामुळे बापानेच पोटच्या मुुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई नाका शिवारात ही घटना सोमवारी (दि. 4) उघडकीस आली आहे. या प्रकरणी बापाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आठवड्यातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे. नांदूर नाका येथे तीनच दिवसांपूर्वी अनैतिक संबंधात अडसर ठरतो, म्हणून मातेने आणि तिच्या प्रियकराने सात वर्षीय मुलाचा खून केला होता. यानंतर काही दिवसातच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. नीलेश प्रभाकर माळवाड असे मृत मुलाचे नाव आहे. तर प्रभाकर माळवाड असे अटक केलेल्या बापाचे नाव आहे. या प्रकरणी मृताची आई जयश्री माळवाड यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश दोन बहिणी, आई जयश्री व वडील प्रभाकर माळवाड यांच्यासोबत जनरल अरुणकुमार वैद्यनगरमधील भक्ती-सिद्धांत सोसायटीत राहत होता. प्रभाकर माळवाड यांच्या विवाहबाह्य संबंधावरून वडील व मुलात कायमच वाद व्हायचे. त्यात प्रभाकर ‘मुलाला खून करून टाकेन’ अशी कायमच धमकी द्यायचा. वर्षापूर्वी संशयित प्रभाकर यांनी त्यांची दीड एकर शेती त्यांच्या कल्पना या दुसऱ्या महिलेच्या नावावर केल्यापासून वडील व मुलातील वाद विकोपाला गेले होते.
रविवारी (दि.3) रात्री दहाच्या सुमारास जेवताना बापलेकात पुन्हा वाद झाला. नीलेशने शेतात पोल्ट्री फार्म टाकून द्या, अशी मागणी केल्याने संतापलेल्या प्रभाकरने मुलगा नीलेशला मारहाण केली व त्याच्या छातीवर बसून गळा आवळून ठार मारल्याची तक्रार मुलाची आई व प्रभाकर यांच्या पत्नी जयश्री माळवाड यांनी दिली आहे. त्यावरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून बापाला अटक करण्यात आली आहे.