बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाची स्थिती, सरकारमधील घटक पक्षांच्या एकमताला होणारा विलंब इत्यादी कारणांमुळे राज्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या विलंबाने होत आहेत. काही दिवसांपूर्वीच 2 सप्टेंबरला बदल्यांची पहिली यादी काढली होती. तिसर्या लॉटनंतर अजूनही 2 वरिष्ठ आयपीएससह 6 अधिकारी वेटिंगवर आहेत. या बदल्या कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदल्या टप्प्याटप्प्याने आणि सोयीनुसार वेटिंगचा मार्ग अवलंबून केल्या जात असल्याने विलंब होत आहे. यावरून टिकासुद्धा होत आहे. अजूनही दोन वरिष्ठ आयपीएससह सहा अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. बदल्यांना उशीर होत असल्याने आता महासंचालकाच्या अखत्यारीतील उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या बदल्या कधी केल्या जातात, याकडे पोलीस दलाचे लक्ष आहे.
बदली झालेले अप्पर महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष महानिरीक्षक कैसर खालिद, तसेच चार मपोसे अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील कोरोना महामारीमुळे सुरुवातीला या वर्षीच्या सर्वसाधारण बदल्या रद्द केल्या होत्या. जुलैमध्ये बदल्यांना मंजुरी मिळाली. परंतु, राज्य सरकारमधील तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत आणि डीजींचे मत, यानंतर पहिली यादी 2 सप्टेंबरला जारी झाली. तर 30 सप्टेंबरला मध्यरात्री 43 आयपीएस व 107 उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. उर्वरित दर्जाच्या सुमोर तेवढ्याच बदल्या अजून होणार असल्याने बदली प्रक्रियेसाठी सलग चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे.