सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – ‘जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’ फेम प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोलापूरात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यानंतर आनंद शिंदे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का अशी चर्चा होताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत. नुकतीच आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. सध्या ते सुखरुप असल्याचे समजत आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद शिंदे तसेच त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे यांना विधानसभेची ऑफर दिली होती.
आनंद शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. मातोश्रीवर आठवड्याभरापूर्वीच याबाबत बैठक झाली होती. आनंद शिंदे यांनी मात्र या बैठकीत निवडणूक लढवण्यात आपल्याला रस नसल्याचे सांगितले. इतकेच नाही तर फक्त शिवसेनाच नाही तर, राष्ट्रवादी, आरपीआय आणि एमआयएम हे पक्षही शिंदे पिता-पुत्रांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील होते.