बहुजननामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या दोन क्रिकेटपटूंवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नदीम अहमद आणि इरफान अहमद हे दोन खेळाडू या प्रकरणात दोषी आढळून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या खेळाडूंनी एका सामन्यात फिक्सिंग केल्याचा संशय आयसीसीला आल्याने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिले. पथकाने केलेल्या चौकशीत हे खेळाडू दोषी आढळले. याबाबत पथकाने त्यांचा अहवाल आयसीसीला सादर केला. त्यानंतर आयसीसीने अहवालानुसार या दोन्ही खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
नदीम आणि इरफान हे दोघेही भाऊ असून पाकिस्तानातील बहावलपुर येथील आहेत. नदीमचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ रोजी तर इरफानचा जन्म २० नोव्हेंबर १९८९ रोजी झाला होता. इरफान २००८ -०९ मध्ये हाँगकाँगचा सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरला होता. सध्या हे दोघे हाँगकाँगकडून खेळतात. त्याचबरोबर या संघातील हसीब अमजदवरही पाच वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे.
फिरकीपटू असलेला नदीमने २५ एकदिवसीय आणि २४ ट्वेन्टी- २० सामने खेळले आहे. एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे ३८ आणि ट्वेन्टी-20 सामन्यात २५ बळी घेतले आहेत. तर नदीमने २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इरफान हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने आतापर्यंत सहा एकदिवसीय आणि आठ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ९९ धावा आणि ८ बळी मिळवले आहेत, तर ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याने ७६ धावा आणि ११ बळी घेतले आहेत.