बहुजननामा ऑनलाइन टीम – सोलापूर-पुणे महामार्गा जवळ असलेल्या बी. पी. एड कॉलेजच्या परिसरात चिंचेच्या झाडाच्या फांदीला प्रियकर आणि प्रेयसीने तोंडाला बांधायच्या स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक(suicide) प्रकार बुधवारी (६ जानेवारी) दुपारी उघडकीस आला. भूषण (भैय्या) धनंजय पडवळकर (१९, रा. उजनी वसाहत, रेल्वे स्टेशन जवळ) व तेथीलच १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना भूषण पडवळकर यांचे चुलते संजय पडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीसारखा सकाळी उठून भैय्या शेतात कामासाठी गेला होता. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास डोक्याचे केस कमी करुन येतो असे सांगून तो घरातून निघून गेला. दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान कळले की बी. पी. एड कॉलेजजवळ तुमच्या पुतण्याने व मुलीने झाडाला गळफास घेतला आहे. नंतर तातडीने कुटूंबीय घटनस्थळावर गेले असता पुतण्या भैय्या व त्याच्या सोबत फास घेतलेली मुलगी बघितली.
घटनस्थळावरुन काही जणांनी सांगितल्यानुसार, गळफास घेतलेले युवक व युवती या वेगवेगळ्या जातीतील असून, त्यांच्या प्रेमाला घरातून पाठींबा मिळणार नाही, या भीतीपोटी प्रेमी युगलांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा. दरम्यान, या प्रेमी युगलांनी केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.