बहुजननामा ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाबाबत सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे. पण याप्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे असेही शिवसेनेने सामनातून म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याच वेळी कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ‘सातारकरां’पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणार्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी साफ सांगितले आहे. उदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार असून मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही ‘राजे’ आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले. राज्यातील विरोधी पक्षांचे लोक त्याचे खापर सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही, तर एकमेकांच्या मांडीस मांडी लावून, खांद्यास खांदा भिडवून मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा गुंता सोडवण्याची आहे, असे शिवसेनेने सांगितले आहे. भाजपा नेत्यांनी हा प्रश्न घेऊन पंतप्रधान मोदींचे मन वळवायला हवे. सध्या मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे, पण ‘मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या’ असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढार्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर शिवसेनेने दिले आहे.