पुणे : Shivsena Pune | पुण्यातील ठाकरेंच्या युवासेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशाची मागणी या गोष्टींना वैतागून राजीनामे देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील पत्र पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना पाठवले आहे.
आदित्य ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख सप्रेम जय महाराष्ट्र. वंदनीय हिंदुहृदयसम्राट, श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या ज्वलंत हिंदुत्व मराठी माणसाच्या प्रेमाबद्दल मागील अनेक वर्ष युवा सेना वाढवण्यासाठी व नविन युवक संघटना वाढवण्यासाठी आम्ही मनापासून प्रामाणिक प्रयत्न केले आणि काम केले परंतु आपण दिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी घाणेरडी वागणूक आम्हाला दिली गेली.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, पक्षांतर्गत गटबाजी, शिवसेना पक्ष आणि मतभेद हे कायम पाहायला मिळत होते. व युवासेना पदासाठी पैशाची मागणी केली जात होती. या सर्व त्रासाला वैतागुन आम्ही सर्व युवासेनेचे निष्ठावंत पदाधिकारी सामुहिक राजीनामा देत आहोत.
हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्रातील जनतेचे लोकसेवक कार्यक्षम मुख्यमंत्री यांच्या कामाने व खऱ्या शिवसेनेच्या विचाराने प्रेरीत होऊन यापुढे आम्ही खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे व पुर्वेश सरनाईक आणि युवासेना सचिव किरण साळी यांच्यासोबत पुढील राजकिय व सामाजिक काम करण्याचा निश्चय केला आहे. आणि आमच्या सोबत असंख्य पदाधिकारी प्रवेश करत आहे, असे या पत्रात पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.