सीओ पाऊलो वृत्तसंस्था – ब्राझीलमधील तरुंगात एका गटाने केलेल्या हल्ल्यात तब्बल ५७ कैद्यांचा मृत्यू झाला. तर यातील १६ कैद्यांचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी हा धक्कादायक राजधानी बेलेमपासून ८५० किमीवर असलेल्या अल्टामीरा येथे घडला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणांनी संयुक्त प्रयत्न करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. असं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील कैदी नाश्ता करण्यासाठी बसले होते. त्यावेळी दुसऱ्या सेलमधून आलेल्या हल्लेखोरांनी घुसखोरी करत हल्ला केला. हल्लेखोरांनी सेलमध्ये प्रवेश करत कैद्यांना मारहाण केली. त्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. अल्टामीरा जेलमध्ये सुमारे पाच तास हा हिंसाचार सुरु होता. या हल्ल्यात तब्बल १६ जणांचे मुंडके शरीरापासून वेगळे करण्यात आले आहे. तर त्यानंतर आग लावण्यात आली. तेव्हा या आगीत गुदमरून ४१ जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी दोन गार्ड्सना ओलीस ठेवले होते. त्यानंतर त्या दोघांची सुटकाही करण्यात आली. परंतु हा रक्तरंजित हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. तर या कारागृहाची क्षमता २०० कैद्यांची असताना त्यात सध्या ३११ कैदी राहात होते. हा हल्ला स्थानिक होता. तर यात आपल्या दुश्मन गटाला संपविण्यासाठी कैद्यांनी हिंसाचार केल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.