मीरारोड : बहुजननामा ऑनलाइन – मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने (BJP) बहुमताच्या बळावर स्वीकृत सदस्य नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्ती करून शिवसेनेसह (Shivsena) काँग्रेसला (Congress) धक्का दिला. मात्र, आमदार गीता जैन (Geeta jain) यांच्या तक्रारीनंतर नगरविकास विभागाने ह्या दोन्ही ठरावांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिल्याने शिवसेनेचा हा भाजपला प्रतिधक्का मानला जात आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. गेल्या सोमवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने पाणीपुरवठा व मलनि:स्सारण, शिक्षण व समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार, क्रीडा व सांस्कृतिक, विधी आणि नियोजन आणि आरोग्य परिक्षण, वैद्यकीय सहाय्य उद्यान व शहर सुशोभीकरण अशा चार तदर्थ समित्यांवर भाजपच्या नगरसेवकांची नियुक्तीचे ठराव केले होते. या विरोधात आमदार गीता जैन यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार केली.
तदर्थ समित्या ह्या जुलै 2018 ते जुलै 2019 ह्या काळापुरत्याच होत्या. त्यामुळे त्या रद्द झालेल्या असून त्या पुन्हा स्थापन करण्यासाठी सभागृहात दोन तृतीयांश संख्याबळ आवश्यक आहे. मात्र संख्याबळ नसताना भाजपने केवळ त्यांचेच सदस्य नियुक्तीचा ठराव केला. त्यामुळे तो नियमबाह्य असल्याने ठराव विखंडित करण्याची मागणी आमदार जैन यांनी केली होती.
तसेच स्वीकृत सदस्य नियुक्तीचा ठराव करताना ही भाजपने बहुमताच्या बळावर आयुक्तांनी प्रस्ताव दिलेल्या पाच पैकी भाजपचे तीन आणि काँग्रेसचा एक अशा चार उमेदवारांचीच स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्तीचा ठराव केला. शिवसेनेच्या उमेदवारास मात्र कोरोना काळात त्याने जेवण पुरवण्याचे कंत्राट घेतल्याचा आक्षेप घेत त्याचे नाव वगळले. भाजपाने दिलेला धक्का सेनेला चांगलाच बसला. आमदार जैन यांनी सदर स्वीकृत नियुक्तीचा ठराव देखील विखंडित करण्याची तक्रार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
आमदार गीता जैन यांच्या दोन्ही तक्रारींवर मंत्री शिंदे यांनी कार्यवाही करत दोन्ही ठरावास स्थिगीती दिली. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अवर सचिव नवनाथ वाठ यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून दोन्ही ठरावास शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिल्याचे कळवले आहे.