नवी दिल्ली: वृत्तसंस्था – जगावर कोरोनाचे संकट कायम असतानाच आता इबोलाच्या विषाणूचा शोध लावणाऱ्या संशोधकाने धोक्याचा इशारा दिला आहे. भविष्यात येणारे विषाणू कोविड-19 पेक्षा जास्त धोकादायक राहणार असल्याचे भाकीत प्रा. डॉ. जीन-जॅक्स मुएम्बे ताम्फुम यांनी वर्तवले आहे. डॉ. जीन यांनी 1976 मध्ये इबोलाचा विषाणू शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांनी वर्तवलेला अंदाज महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता आणखी चिंतेत भर पडली आहे.
भविष्यात असंख्य विषाणू येतील. यातले काही सध्याच्या कोविड-19 पेक्षा जास्त धोकादायक असणार आहेत, असा दावा डॉ. जीन यांनी केला आहे. या विषाणूंच्या निर्मितीची प्रक्रिया आफ्रिकेतल्या उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये सुरू झाली आहे. आपण आता अशा जगात राहत आहोत, जिथे नवे नवे रोगकारक समोर येतील. मानवासाठी अतिशय धोकादायक असलेले विषाणू मोठ्या प्रमाणात आफ्रिकेच्या वर्षावनांमध्ये तयार होत आहेत. त्यांची संख्या अगणित आहे, असे ते म्हणाले.
डॉ. जीन यांनी इबोलाचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याासठी बाधितांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. इबोला धोकादायक रोग असून तो रक्तस्रावास कारणीभूत ठरतो. या रोगाचा प्रसार सुरू होताच सुरुवातीला तब्बल 88 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला होता. याशिवाय ज्या रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू होते, तिथले 80 टक्के कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. यम्बुकु मिशन रुग्णालयात इबोलाचा शोध लागला होता.