बहुजननामा ऑनलाइन टीम – भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार सोमवारी (दि. 4) क-हाड- पाटण रस्त्यावर पाहायला मिळाला. मद्यधुंद भरधाव कंटेनर चालकाने दोघा दुचाकीस्वारांना चिरडल्याची धक्कादायक (drunk driver crushes)घटना घडली आहे. यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. कऱ्हाड ते पाटण रस्त्यावर मुंढे येथील डायमंड खांडसरी समोर रात्री पावणे आठच्या सुमारास अपघात झाला. दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या प्रकरणी कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर तब्बल तासभर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
अमित पांडुरंग पाटील (वय 29, रा. सुपने) जागीच ठार झालेल्याचे नाव आहे. तर अझहर शेख (रा. साकुर्डी) असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत भरधाव कंटेनरचालक पाटणहून येत होता. त्यावेळी येतानाच त्याने काही वाहनांना हूल दिली होती. चालकाचा मुंढे येथे आल्यानंतर ताबा सुटला. त्यामुळे कंटेनरने रस्ता दुभाजक तोडून पाटणच्या दिशेने जाणाऱ्या दोन दुचाकींना चिरडले. त्यात ऍक्टिव्हा होती. दुसरी टीव्हीएस मोपेड होती. पहिल्यांदा कंटेनरने मोपेडला चिरडले. त्यावरील अमित पाटील जागीच ठार झाले. त्याच्याच मागील ऍक्टिव्हालाही कंटेनरने चिरडले. अझहर शेख जखमी झाले. मृत पाटील यांचे येथील सह्याद्री हॉस्पिटल समोर स्पोटर्स कपड्याचे दुकान आहे. ते बंद करून ते घरी निघाले होते. त्या वेळी दुर्घटना घडली. अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक पोलिसांनी तासाभराने सुरळीत केली.