बहुजननामा ऑनलाईन टीम – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात गाजत आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे बोट दाखवले जात असल्याने वातावरण तापले आहे. राठोड गेल्या काही दिवसांपासून गायब आहेत. मात्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू आहे. आता संजय राठोड कधी समोर येणार यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच खुलासा केला आहे. संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. राठोड गुरुवारी (दि. 18) प्रसारमाध्यमासमोर येऊन स्पष्टीकरण देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. यामुळे राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यासाठी पुरावा म्हणून दिलेल्या ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. तसेच यवतमाळमध्ये पुजा राठोड नावाच्या मुलीचा गर्भपातही केल्याचे समोर येत आहे. या साऱ्या नाजूक प्रकरणावर आता संजय राठोडच प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण देणार आहेत.
दरम्यान आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यात काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.