कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – महान भारत केसरी, रूस्तम-ए-हिंद आणि राष्ट्रकुल रौप्यपदक विजेते दादू चौगुले यांचे आज (रविवार) दुपारी कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. दादू चौगुलेंच्या निधनाची बातमी समजल्यावर कोल्हापूरसह परिसरातील कुस्तीप्रेमींवर शोककळा पसरली. रविवारी दुपारी 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने केंद्र सरकारने चौगुलेंचा सन्मान केला होता. पैलवान आंदळकर, बाळ गायकवाड, बाळू बिरे यांच्या तालमीत घडलेल्या चौगुलेंनी कोल्हापूरचा जरीपटका देश-विदेशात मानाने फडकवत ठेवला होता. अनेक मल्लांना त्यांनी लाल मातीसह मॅटवर अस्मान दाखविलं होते. पैलवान दादू चौगुलेंचे नाव आखाडयात मोठया आदरानं घेतलं जातं.
लाल मातीसह मॅटवरही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा झेंडा त्यांनी फडकवला होता. सन 1973 साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या 100 किलो गटातील कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. त्यांनी कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक वर्ष संघटनात्मक काम केलं.
Visit : bahujannama.com