मुंबई : बहुजननामा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून(ईडी) चौकशीची नोटीस आली असून त्यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, कोहिनूर मिल प्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यानंतर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, “मनसे अशा नोटीशींना भीक घालत नाही.” सध्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत अशात कोहिनूर मिल प्रकरण पुन्हा समोर आल्याने राज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कोहिनूर सीटीएनएल ही कंपनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची आहे. दादरमधील सेना भवनासमोरील कोहिनूर स्क्वेअर या जुळ्या टॉवरचा प्रकल्प उभारत होती. सरकारी क्षेत्रातील कंपनी इंफ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनांशियर सर्व्हिसद्वारे(आयएलएफएस) मुंबईतील कोहिनूर सीटीएनएल कंपनीला दिलेल्या 860 कोटींचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयने(ईडीने) ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तपास सुरु केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. यासाठी आयएलएफएसकडून 860 कोटींचं कर्ज घेतलं. यात कंपनीला मोठं नुकसान झाल्याने त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले. जेव्हा आयएलएफएसने शेअर्स विकले तेव्हा 2008 साली राज ठाकरे यांनीही यातील आपले सर्व शेअर्स विकले. परंतु असे असताना त्यानंतरही राज याचा कंपनीत सक्रिय सहभाग होता असे सांगत ईडीकडून आता चौकशी सुरु आहे.
तब्बल 2100 कोटींचा हा प्रोजेक्ट रिअल इस्टेटमधील महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. 900 कोटींचं कर्ज न फेडल्याने उन्मेष जोशी यांनी हा प्रोजेक्ट गमावला. दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद आहे. 900 कोटींचं कर्ज फेडण्यास कोहिनूर ग्रुप अपयशी ठरल्याने बँकांनी जून 2017 मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे धाव घेतली. ट्रिब्युनलने हा प्रोजेक्ट प्रभादेवीमधील आर्किटेक कंपनी संदीप शिक्रे अँड असोसिएट्सला देण्याची शिफारस स्विकारल्याने उन्मेशी जोशी यांना प्रोजेक्ट गमवावा लागला. 26 जानेवारीपासून या प्रोजेक्टला पुन्हा सुरुवात झाली आहे. पुढील 15 ते 18 महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
राज ठाकरेंची चौकशी का ?
आयएलएफएस ग्रुपने या प्रोजेक्टमध्ये 225 कोटींची थेट गुंतवणूक केली होती. 2008 साली कंपनीने अवघ्या 90 कोटींच्या किंमतीवर सर्व शेअर्सवरील मालकी हक्क सोडला. याच वर्षी लगेचच राज ठाकरे यांनी आपल्या मालकीचे शेअर्स विकून कंपनीमधील आपला सहभाग संपवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी कोहिनूरमधून अचानक पाय का काढला या संदर्भात ईडी चौकशी करणार आहे.
नेमकं काय आहे कोहिनूर स्क्वेअर ?
– या पूर्ण प्रोजेक्टची किंमत 2100 कोटी
– दादरसारख्या ठिकाणी 52 आणि 35 मजल्यांचे दोन जुळे टॉवर
– ऊर्जाबचत आणि पर्यावरणस्नेही इमारत म्हणून सुर्वणपत प्राप्त
– पहिल्या पाच मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स, उर्वरीत 47 मजले सिंगापूर ब्रँडचे आयू मुंबई हे फाईव्ह स्टार हॉटेल, व्यापारी सदनिका.
– जुळ्या इमारतीतील पहिले 15 मजले दोन्ही टॉवर्सच्या पार्किंगसाठी, तब्बल दोन गाड्यांची व्यवस्था, बाकी 20 मजल्यांवर सदनिका