चंदीगड : वृत्तसंस्था – पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब मध्ये 80 वर्षांची एक वयस्कर महिला मोकळ्या मैदानात असणाऱ्या विटांच्या मध्ये अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. गुज्जर रोडजवळ एका ठिकाणी दोन फूट उंच मातीच्या भिंतीवर लाकडी फळ्या ठेवल्या होत्या त्यामध्ये ही महिला आढळून आली. रस्त्याने जाणाऱ्या एकाने या माहिलेबद्दलची माहिती एका समाजसेवी संस्थेला दिली. या संस्थेने पोलिसांच्या मदतीने या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र काही वेळातच या महिलेचा मृत्यू झाला.
असे सांगितले जात आहे की, या महिलेची दोन मुलं आहेत. एक अधिकारी तर दुसरा राजकारणात आहे आणि नात देखील पीसीएस अधिकारी आहे. तरी देखील या महिलेला अशा अवस्थेत एकटीला सोडण्यात आलं होतं.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तिच्यावर उपचार होते तेव्हा समजलं कि तिच्या डोक्यात अक्षरशः किडे पडले होते. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे तिची प्रकृती नाजूक होती. तिच्या मुलाला जेव्हा आईबद्दल समजलं तेव्हा येऊन त्याने तिला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये दाखल केलं पण तिथं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती देताना एएसआय दिलबाग सिंह यांनी सांगितले की, या महिलेच्या देखभालीसाठी तिच्या मुलांनी ज्यांना ठेवलं होतं त्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून या माहिलेची ही अवस्था झाली होती. महिलेला तिच्या कुटुंबाची देखील साथ मिळाली नाही. याबाबत अधिक तपास सुरू आहे.