बहुजननामा ऑनलाइन टीम – पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पाचव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद (League Cricket Tournament)टी-२० क्रिकेट स्पर्धेत हृतुजा देशमुख हिच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लिजेंडस् पँथर्स संघाने सिम्हा वॉरीयर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मुंढवा येथील लिजेंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. सिम्हा वॉरीयर्स संघाने सावध सुरूवात केली. माया सोनावणे (१९ धावा) आणि तेजश्री ज्ञानेश्वर (१८ धावा) या दोघींनी संघाला ३६ धावांची सलामी मिळवून दिली. त्यानंतर कर्णधार सायली लोणकर (२५ धावा) आणि चरमय गवई (२४ धावा) यांनीही ४० धावांची भागिदारी केली. पण मोठी खेळी करण्यात सिम्हा संघाचे फलंदाज अपयशी ठरले व संघाने २० षटकात ६ गडी गमावून १०३ धावांचे आव्हान उभे केले.
लिजेंडस् पँथर्स संघानेही कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता सुरूवातीपासूनच धावफलक हलता ठेवला. भुमिका उम्बरजे (नाबाद ३५ धावा) व यष्टीरक्षक-फलंदाज श्रावणी देसाई (१४ धावा) यांनी ५२ चेंडूत ३६ धावांची सलामी दिली. त्यांनतर आलेल्या हृतुजा देशमुख (२७ धावा) हिला साथीला घेत भुमिकाने धावा जमवित सामन्यावर आपली घट्ट पकड निर्माण केली. या दोघींनी दुसर्या गड्यासाठी ४३ चेंडूत ४६ धावांची भागिदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. कर्णधार किरण नवगिरे (नाबाद १६ धावा) आणि भुमिका यांनी नाबाद खेळी करून संघाला १७.२ षटकात विजय मिळवून देत स्पर्धेचे विजेतेपद पटकावून दिले. हृतुजा देशमुख हिला अंतिम सामन्याचा मानकरी हा किताब मिळाला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे संचालक आणि पुनित बालन ग्रुपचे सर्वेसर्वा पुनित बालन यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या लिजेंडस् पँथर्स संघाला आणि उपविजेत्या सिम्हा वॉरीयर्स संघाला करंडक, मेडल्स् आणि प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मालिकेचा मानकरी हा किताब पुनम खेमनार (एचपी सुपरनोव्हाज्, २१२ धावा व ७ विकेट), सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब मुक्ता मगरे (ऑक्सिरिच स्मॅशर्स, १७८ धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा मान उत्कर्षा कदम (सिम्हा वॉरीयर्स, ९ विकेट), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा मान श्रावणी देसाई (लिजेंडस् पँथर्स) हिला देण्यात आला. तसेच स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूचा मान सिम्हा वॉरीयर्सच्या दुर्वा मांडे हिला देण्यात आला. स्पर्धेचे संयोजक सनी मारवाडी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि उपस्थितांचे आभार मानले.